माझे दैवी अनुभव भाग ६
इकडे माझे Graduation सुरु असताना माझ्या मित्राचं सुद्धा Graduation सुरु होतं. जशी माझ्या आईला माझ्या पोटापाण्याची काळजी वाटायची तशीच त्याच्या घरच्यांना सुद्धा त्याच्या पोटापाण्याची काळजी वाटायची. त्यामुळे त्याचा ज्योतिषाचा अभ्यास त्यांना फारसा पसंत नव्हता. मग त्याला घरच्यांनी काही काम सांगितले की आम्ही एकत्र जायचो आणि त्यावेळी ज्योतिषावर चर्चा करायचो. असेच एकदा जुन्या स्कूटरवरून जात असताना हुतात्मा चौकात पोलिसांनी आम्हाला पकडले. (हुतात्मा चौक म्हणजे दगडूशेठ गणपती आणि लाल महाल यांच्या मधला चौक.) काय तर म्हणे Scooter ची Number Plate नीट दिसत नाही. त्या पोलिसाने बाजूला उभा असलेल्या ३ star officer कडे म्हणजे साहेबाकडे नेले. बाकी सगळे कागद आहेत पण Number Plate नीट दिसत नाही तेव्हा पावती फाडावी लागेल असे साहेबांनी आम्हाला सुनावले.
आधीच कडकी असताना फुकटचे दंड कोण भरणार? अब कुछ तो करना पडेगा! असा विचार मनात घोळत असतानाच साहेबांच्या बोटातील मणिकाची अंगठी माझ्या नजरेने हेरली आणि मी तत्क्षणी उचल खाल्ली. डोक्यात पंचांग असायचंच. पटकन मनात प्रश्न कुंडली मांडली आणि साहेबांना म्हटलं की तुम्हाला सध्या काही पोटाचा विशेष त्रास सुरु आहे का? माझ्या मित्राने चमकून माझ्याकडे पाहिलं असता त्याला खूण केली आणि तो पण लगेच सुरु झाला. ते साहेब माझ्या प्रश्नामधून सावरतात तोच माझा मित्र म्हणाला तुमचा मुलगा सध्या आजारी आहे का? आता मात्र साहेब आतून हालले. हे काय चाललंय ते त्यांच्या लक्षात येईना. ते आम्हाला म्हणाले माझ्याबरोबर चौकीवर चला मग आपण बोलूया. असं म्हणत त्यांनी आम्हाला जवळच्या फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये आणलं. तिथे त्यांचं भलं मोठं Cabin होतं. आम्हाला आत बोलावले आणि कोणालातरी ३ चहा आणि काहीतरी खायला आणायला सांगितलं. तुम्हाला माझ्याबद्दल काय काय माहित आहे ते आता सांगा आणि तुम्ही कोण आहात ते सुद्धा सांगा असं ते म्हणाले. आमचा ज्योतिषाचा अभ्यास आहे आणि आम्ही सांगितलेल्या दोनही गोष्टी बरोबर असल्यामुळे ते जाम Impress झाले होते. मी चहा पीत पीत आणखी एक दोन भाकितं केली आणि चहा संपल्यावर गप्प झालो कारण कामगिरी फत्ते झाली. त्यांच्याकडून उलटं आम्ही चहा पाणी घेतलं याबद्दल मी स्वतःला धन्य मानलं.
माझ्या मित्राने मात्र त्यांना पूर्ण impress करायचं असं ठरवलंच असावं. त्याने अनेक भाकितं केली आणि शेवटी येत्या Spetember End पर्यंत तुम्ही परदेशात जाल असं सांगितलं. ही गोष्ट साधारण १९९६ किंवा १९९७ मधली आहे. त्यावर साहेब म्हणाले की आम्ही सरकारी माणसं आम्ही कशाला परदेशात जाणार? पण गेलो तर मात्र तुम्हाला सांगितल्याशिवाय जाणार नाही. असं म्हणत त्यांनी आमचे Phone Numbers मागितले. आमच्या घरी Phone वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता. पण मित्राकडे मात्र घरी Phone होता आणि साहेबांनी तो लिहून घेतला.
आम्ही दोघांनी घरी आल्यावर छाती फुगवून सगळी कहाणी सांगितली. दोघांच्याही घरच्यांनी असले धंदे करायच्या ऐवजी अभ्यासाकडे लक्ष द्या असा usual सल्ला दिला आणि विषय तिथेच बंद झाला.
सप्टेंबरच्या शेवटी माझा मित्र मला म्हणाला की साहेबांचा Phone आला होता पण मी घरी नव्हतो. त्यानंतर बरोब्बर एका वर्षानी साहेबांचा पुन्हा Phone आला. त्यावेळी मात्र माझा मित्र त्याच्या घरी होता. साहेब म्हणाले तुम्ही सांगितल्याप्रमाणे ध्यानी मनीं नसताना एका वर्षाकरीता मी Deputation वर परदेशात जाऊन आलो. जायच्या आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला Phone केला होता पण बोलणं होऊ शकलं नाही. आता तुम्ही दोघेही एक दिवस आमच्या घरी जेवायला या!
आम्ही त्यांच्या घरी मोठ्या अभिमानाने जेवायला गेलो. त्यांचं घर माझ्या दृष्टीने फारच भारी होते. त्यांनी आमच्याकरीता लांबलचक Menu Plan केला होता. या प्रसंगानंतर ते अगदी Retire होईपर्यंत आमच्या संपर्कात होते. अनेकदा आम्ही त्यांची मदतही घेतली आणि त्यांनी सुद्धा Out of the way जाऊन काही कठीण प्रसंगात स्वतः हुन मदत केली.
त्यानंतर एकदा स्वामी विवेकानंदांचा एक प्रसंग मी वाचला त्यात स्वामी विवेकानंद त्यांच्या शिष्याला म्हणाले “आज तू माझा शिष्य झालास म्हणजे तुझ्या मनातले विचार ओळखण्याचा अधिकार मला प्राप्त झाला. आत्तापर्यंत मात्र मला तो अधिकार नव्हता.” यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण अशाप्रकारे पूर्वपरवानगीशिवाय पत्रिका मांडणं योग्य नाही आणि मी उठ सूट प्रश्नकुंडली मांडणं बंद करून टाकलं.
मी एक नियम करून टाकला की आपण कोणाचीही Privacy Invade करायची नाही. आता तर मी जवळच्या नातेवाईकांची पत्रिका सुद्धा त्या व्यक्तीला माहिती नसेल तर पाहत नाही.
अगदी हल्लीच एका राष्ट्रीय राजकारणातल्या माता पुत्रांची (तुमच्या मनात आले ते नसावेत!) पत्रिका पाहण्याची विनंती अगदी एका दोघांच्याही जवळच्या व्यक्तीने केली. मी त्यांना सांगितलं की त्या दोघांना एखादा message, call, meeting काहीतरी करायला सांगा. तिकडून निरोप आला की असं जमणार नाही पण तुम्ही सांगाल ती Fees मात्र मिळेल. मग मी पण निरोप पाठवला की असं जमणार नाही हा प्रश्न Fees चा नाही Values चा आहे. जवळ जवळ १ महिना Follow Up करून त्यांनी माझा नाद सोडून दिला.
सुरवातीला मी लहान असल्याने आणि बहुधा मोफत भविष्य पाहत असल्याने अनेक जण माझी परीक्षा घेण्याच्या हेतूने काहीतरी विचारात आणि मी सुद्धा त्याच त्वेषाने त्यांना भाकितांनी चकीत करत असे त्यातले काही मजेशीर प्रसंग येत्या Posts मध्ये पाहूया.
क्रमशः
(c) Gaurish Borkar #DaiviAnubhav #GaurishBorkar
Comments
Post a Comment