आमचे स्वामी ६
मला वाटतं २००१ साली स्वरूपयोगचं मोठं शिबिर पावसला झालं. Mostly ते पहिलं मोठं शिबीर होतं. या शिबिराला महाराष्ट्रातील विविध भागातून अनेकजण आले होते. शिबिरार्थींची संख्या साधारण ४५० ते ५०० असावी. अडीच ते तीन दिवसांचा सुंदर कार्यक्रम होता. माझही हे पहीलचं शिबिर होतं.
पावसाचे स्वामी स्वरूपानंद, त्यांचे एक उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ आणि स्वामी माधवनाथांचे एक उत्तराधिकारी म्हणजे आमचे स्वामी, स्वामी माधवानंद. थोडक्यात आम्ही आमच्या पणजोळी गेल्यासारखं होतं. स्वामींनी पहिल्याच session मध्ये सांगितलं की आपण मोठ्या स्वामींच्या इथे आलेलो आहोत, त्यामुळे मला इथे नमस्कार करायचा नाही. त्यामुळे स्वामीजींना भेटण्याचा योग येण्याची शक्यता फार कमी होती.
तीन दिवसांच्या शिबिरामध्ये सकाळी सूर्योपासना, योगासनं आणि त्यानंतर ध्यान असायचं. Breakfast नंतर प्रश्नोत्तरांचं session किंवा स्वामींचं प्रबोधन असायाचं. Lunch नंतर Group discussions आणि त्याची presentations असायची. संध्याकाळच्या वेळी स्वामीजींचं प्रवचन असायचं. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आणि दिंडी असायची. मधे मधे अभंग गायन, धून सांगणं वगैरे असे कार्यक्रम असायचे. त्यामुळे Stage वर स्वामीजींबरोबर अनेकजण असायचे.
असंच एका सकाळच्या Session नंतर स्वामीजींनी सांगितलं की स्वामी स्वरूपानंद जिथे जवळ जवळ ४० वर्ष राहिले तिथे म्हणजे अनंत निवासला आपण सगळे जाणार आहोत. अनंत निवास इथे गर्दी होऊ नये म्हणून आपापल्या गतीने आम्ही सगळे निघालो. माझी तशीही कोणाशी फार ओळख नव्हती त्यामुळे मी आपला एकटाच आरामात गेलो. अनंत निवास इथे स्वामी स्वरूपानंद यांची खोली विशेष जतन केली आहे. त्या खोलीमध्ये रांगेने जाऊन स्वामी स्वरूपानंदांना नमस्कार केला आणि परत आलो. परत येताना मात्र थोडा उशीर झाल्याने झप झप पावलं टाकत येऊ लागलो. त्यामुळे थोडा श्वास लागला. स्वामी स्वरूपानंद ध्यानामध्ये श्वासावर ‘सोऽ-हम’ (स: अहं) घ्यायचे आणि त्या पद्धतीने ध्यान करायला सांगायचे. जरा श्वास लागलेला, म्हटलं चला आपण श्वासावर सोऽहम् घेऊ. असं म्हणून मी जोरात लागलेल्या श्वासावर मनातल्या मनात सोऽहम् घ्यायला लागलो. हा माझा सोऽहम् अगदी समाधी मंदिराच्या जवळच्या hall मध्ये येईपर्यंत सुरू होता.
मी Hall मधे आलो तेव्हा स्वामीजी पलीकडे उभे राहून काही कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत होते. मला पाहून ते वेगाने माझ्याकडे आले. मला रागवलेल्या स्वरात म्हणाले, “सोऽहम एवढ्या जोरात घ्यायचा नसतो, तो अतिशय सूक्ष्म असतो” आणि एका क्षणात मला काही कळायच्या आत निघून गेले.
हा मला एक फार मोठा shock होता. त्यांच्या या बोलण्याने सोऽहम बद्दल मला तसंही काहीच कळलं नाही. पण एक गोष्ट मात्र कळली की स्वामीजींना आपल्या मनात काय चाललंय ते कळत असावं. पण यातून एक प्रश्न निर्माण झालाच की एवढ्या सगळ्या शिबिरार्थिंच्या मनात काय चाललंय हे यांना एकाच वेळी कसं कळू शकेल? यातून स्वामीजींच्या डोक्यात गोंधळ नाही का होत?
सोहम म्हणजे स: अहं. स: म्हणजे तो ईश्वर आणि अहं म्हणजे मी, हे आपल्याला माहिती असेलच. त्यामुळे सोहम म्हणजे तो मीच आहे किंवा आपल्यातील चैतन्य आणि ईश्वरतत्व एकच आहे. सोहम या मंत्राचा हा अर्थ आहे. ईश्वर आहे की नाही असा प्रश्न पडणार्यांनी आपल्यामध्ये चैतन्य आहे की नाही, एवढा विचार केला तर पुरेसा आहे आणि ध्यान करण्यासाठी केवळ एवढंच लागतं.
पुढे लक्षात आलं की सोऽहम हा सुरवातीला भाव आहे. त्यानंतर तो अनुभव होतो आणि शेवटी ती स्थिती किंवा अवस्था होत असावी.
समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलंय की
येकांतीं उगेंच बैसावें । तेथें हें समजोन पाहावें ।
अखंड घ्यावें सांडावें । प्रभंजनासी ॥ ६ ॥
ही कृती आहे.
येकांतीं मौन्य धरून बैसला । तेणें कोण शब्द जाला ।
सोहं ऐसा भासला । अंतर्यामीं ॥ १० ॥
हा अनुभव आहे.
धरितां सो सांडितां हं । अखंड चाले सोहं सोहं ।
याचा विचार पाहातं बहु । विस्तारला ॥ ११ ॥
दासबोध १७ – ५
अखंड 'चाले' सोहं सोहं असं म्हटलंय, म्हणजे ही स्थिती किंवा अवस्था असावी आणि यासाठी ध्यान करणं आवश्यक आहे.
कृती ते अनुभूति हा जसा प्रवास आहे तसाच अनुभूति ते स्थिती हा सुद्धा एक प्रवास आहे. आपल्यासमोर जी काही संत सत्पुरुषांची उदाहरणं असतात (उदा. रामकृष्ण परमहंस, रमण महर्षि, स्वामी स्वरूपानंद) ती स्थिती किंवा ज्ञानाच्या अवस्थेत असणार्या संतांची असतात. त्यामुळे अनेकदा ज्ञान प्राप्त करणं अशक्यप्राय वाटतं. स्वामीजींचा विशेष प्रयत्न हा methodically आणि predictably अनेकांना ज्ञानाची अनुभूति व्हावी यावर होता. कधी कधी ते म्हणायचे की मी उलटं येऊन तुमच्यासाठी ध्यानाच्या प्रवासाचा विचार करतो ज्यायोगे अनेकांना ही अनुभूति प्राप्त होईल. तर कधी ते आम्हा सगळ्यांना assure करायचे की आपल्याकडे अनेकांना ही अनुभूति प्राप्त होईल.
स्वामीजी सांगायचे की तुम्हाला जो मंत्र convenient आहे तो म्हणजे ॐ, सोहम्, श्रीराम, असा कोणताही मंत्र ध्यानात घेतला तरी चालतो. पण मंत्र छोटा असावा म्हणजे तो श्वासावर बसवणं सोपं जातं.
स्वामीजी अनेक संप्रदायांशी संबंधित होते आणि ते विविध संतांची वचनं त्यांच्या प्रवचनांमध्ये उद्धृत करत असत. ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे २ ग्रंथ तर स्वामीजींनी संपूर्ण सांगितले. म्हणजे त्या पूर्ण ग्रंथावर त्यांनी पुण्यात प्रवचनं केली. सन १९९८ मध्ये ज्या वेळी मी अनुग्रह घेतला तेव्हा mostly ८ वा अध्याय संपत होता किंवा ९ वा अध्याय सुरू झाला होता. आणि साधारण २००७ किंवा ०८ साली गीता सांगून पूर्ण झाली. १९९९ मधे दासबोध किती सांगून झाला होता हे मात्र मला आठवत नाही. या प्रवचनांमध्ये अनेक संतांचे अभंग आणि सत्पुरुषांच्या कथा व Quotations स्वामीजी सांगत असत. ते अनेक संप्रदायांच्या बोलावण्यावरून त्या संत/सत्पुरुषांच्या साहित्याचा आणि चरित्राचा सखोल अभ्यास करून त्या संप्रदायातील साधकांना रुचेल आणि पटेल अशा पद्धतीने त्या त्या ठिकाणी जाऊन सुद्धा प्रवचन करत असत. काही वेळा तर असं दिसायचं की स्वामीजींचा त्या संप्रदायातील सत्पुरुषांचा अभ्यास त्यांच्या संप्रदायातील अभ्यासकांपेक्षा जास्त आहे. स्वामीजींकडे विविध संप्रदायातील व्यक्ति ध्यानाच्या मार्गदर्शनासाठी येत आणि स्वामीजी सगळ्या साधकांना तेवढ्याच आपुलकीने मार्गदर्शन करत. यामध्ये निंबाळच्या निंबरगी संप्रदायातील (गुरुदेव रानडे) आणि स्वामी शिवानंदांच्या संप्रदायातील काही व्यक्ति मला माहिती आहेत.
या घटनेनंतर खरं तर स्वामीजींशी मी आतून जोडला गेलो आणि पुढे २०१० / २०११ पर्यंत त्यांच्या संपर्कातही राहीलो.
-गौरीश बोरकर
ऑगस्ट २३ २०२६
#aamacheswami
Comments
Post a Comment