माझे दैवी अनुभव भाग ८
आईची अनेकांशी ओळख असल्याने आमच्याकडे वेगवेगळ्या वयोगटातले अनेक जण अगदी सहज म्हणून येत. अनेकदा मला त्याचा कंटाळा येत असला तरी आई मात्र अनेकदा आलेल्या व्यक्तीशी न चुकता ओळख करून देत असे. असेच एक दिवस संध्याकाळी आमच्याकडे एक आजोबा आले होते आणि आईने माझी त्यांच्याशी नेहमीप्रमाणे ओळख करून दिली. ते गेल्यानंतर मी आईला म्हटलं की हे गृहस्थ एक मोठी आध्यात्मिक Background असलेले असावेत आणि माझा यांच्या आध्यात्मिक Background शी संबंध आहे असं मला वाटलं. तू त्यांना जरा याबद्दल विचार. आईने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाली, तूच त्यांच्या घरी जाऊन काय विचारायचं ते विचार मी यात अजिबात पडणार नाही. मी लगेच दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी Cycle मारत त्यांचा पत्ता हुडकत त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना सगळी माहिती विचारली. ते खरंच एका संप्रदायाशी खूप जवळून जोडलेले होते. ते लागलीच म्हणाले, तुला एवढा संबंध वाटत असेल तर तू अनुग्रह घेच मी स्वामींशी बोलतो. ते दुसऱ्याच दिवशी माझ्या घरी आले आणि त्यांनी मला अनुग्रहाची Date आणि Procedure सांगून टाकली. विशेष म्हणजे फार दिवस मधे नसल्याने मी ज्या व्यक्तीकडून अनुग्रह घेणार होतो त्या व्यक्तीला अनुग्रहाच्या दिवशी पहिल्यांदाच पहिले! पण मला आतून माहीत होतं की या संप्रदायाशी आपला पूर्वीचा संबंध आहे त्यामुळे मनात कोणतीही शंका नव्हती.
या आधीपासुन मी दत्त संप्रदायातील एका व्यक्तीकडे सहजच जात असे. ते Intuition वर अनेक प्रश्नांची उत्तरे देत. शुद्ध तंत्रातील काही तांत्रिक वस्तू सुद्धा ते त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना देत असत. मी तिथे बसून प्रश्न कुंडलीनुसार माझे भाकीत काय आणि ते काय सांगतात याचा पडताळा घेत असे. ते अतिशय प्रामाणिक होते आणि कोणाकडेही पैसे मागत नसत. मी तिथे बसून काय करतो याची त्यांना संपूर्ण माहिती होती पण त्यांनी मला कधीही आडकाठी आणली नाही. फक्त कधी कधी ते एवढंच म्हणत की बोरकर, तुम्हाला सगळं माहितच आहे, तुम्हाला इथे बसायची काय गरज? पण तो केवळ त्यांचा विनय होता. अनुग्रहानंतर असाच एकदा मी त्यांच्याकडे गेलो असता मात्र त्यांची देहबोली वेगळी होती. काय झालं हे मला कळेना. शेवटी निघायच्या वेळी मला म्हणाले “गुरु केलात तुम्ही आता, उगिच इकडे तिकडं फिरू नका. आपण गुरूपदाचा अपमान करू नये.” मी समजून चुकलो आणि त्यानंतर मात्र कधीही त्यांच्याकडेच काय तर पुढची अनेक वर्षे कोणत्याही आध्यात्मिक व्यक्तीकडे मी गेलो नाही.
माझ्या बाबतीत जरी असं झालं असलं तरी आध्यात्मिक गुरु करण्याच्या बाबतीत अतिशय काळजी घेणं आवश्यक आहे. मूलतः आपला उद्देश काय आणि ती व्यक्ती तो उद्देश साध्य करण्यास सहाय्यभूत होऊ शकेल अशी खात्री केल्याशिवाय आध्यात्मिक गुरु करणं योग्य नाही. त्याऐवजी ईश्वर गुरु मानून आपली वाटचाल सुरु ठेवावी. तो सहाय्यभूत होतोच होतो.
माझे आध्यात्मिक गुरु शास्त्रज्ञ होते. पहिल्या २-३ आठवड्यातच त्यांनी माझा सगळा डोलारा जमीनदोस्त केला. त्यांना अनुग्रहाच्या वेळीच हे प्रकरण थोडं वेगळं आहे असा अंदाज आला असावा. मला सुद्धा Interest होता की यांना कितपत कळतं. तुम्ही जर सगळे भाग वाचले असतील तर तुम्हाला आठवत असेल की मी स्वतःहुन काही उपासना ठरवल्या होत्या आणि त्या उपासना नेमाने गेली ७-८ वर्षं मी करत आलो होतो. माझ्या गुरूंनी पहिल्याच आठवड्यात मला सांगितलं की गार पाणी तुझ्या प्रकृतीला सोसणारे नाही तेव्हा तू गरम पाण्याने आंघोळ करत जा. त्यांनी मला हा पहिलाच Shock दिला कारण ही गोष्ट फार कोणाला माहीती असण्याचा प्रश्नच नव्हता. ते आमच्या घरातल्या कोणालाही ओळखत नव्हते किंबहुना अनुग्रहाच्या दिवशी मी त्यांना पहिल्यांदाच भेटलो होतो आणि त्यामुळे यांना खरंच कळतं का हा प्रश्न काही माझा पिच्छा सोडेना.
नंतर एके दिवशी त्यांनी ध्यानाकरीता नाम छोटं आणि सुटसुटीत असलं पाहीजे तेव्हा कोणतंही सुटसुटीत नाम घेण चांगलं असं सांगितलं. (म्हणजे सच्चीदानंद हे नाम फार सोईस्कर नाही की काय?) पण ही गोष्ट ते सगळ्यांनाच सांगत त्यामुळे हे माझ्याच करता नसावं असं मी मानलं. त्यानंतर एक दिवस त्यांनी ही माझी ध्यानाची खोली आहे असं सांगून तिथे असलेल्या एका Cot कडे बोट दाखवलं. त्या Cot वर एक चांगली जाड गादी होती (म्हणजे गादीवर झोपायला काहीच हरकत नाही?). माझ्या मनात पुन्हा शंका निर्माण झाली की यांना खरंच कळतं की काय. मग एक दिवस म्हणाले की कांदा लसूण खाऊ नये असं मी कोणालाही सांगत नाही पण ध्यानाच्या वेळी कोणत्याही उग्र वासाचा अडथळा येऊ शकतो तेव्हा ध्यानाची वेळ सांभाळून खायला हरकत नाही. माझ्या शंकेचं हळूहळू खात्रीत रूपांतर झालं कारण नंतर असे अनंत प्रसंग घडले की ज्यामध्ये त्यांनी अशाप्रकारे माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरं दिली.
पुढे प्रवचनात एकदा उपवास म्हणजे उपविश्य किंवा जवळ बसणे. म्हणून देवाच्या जवळ बसणे म्हणजे उपवास असा अर्थ सांगितला. देवाच्या जवळ बसण्याच्या तयारीत तिथे Alartness टिकून रहावा याकरता योग्य तो आहार करणे हा उपवासाचा भाग आहे. ध्यानाच्या दृष्टीने पाहिलं तर ध्यानापूर्वी पोट जड होऊ नये एवढंच खाणे हा उपवास आहे असं सांगितलं.
यानंतर माझे उपास बंद झाले, गार पाण्याची अंघोळ बंद झाली, सतरंजीवर झोपणे बंद झालं, सच्चीदानंद मंत्र बंद झाला. कांदा लसूण मात्र मी पुढे बरीच वर्षं खाल्ला नाही पण कुठेही खाणार नाही हा हेका बंद झाला. मी हातात काही रत्नं धारण केली होती ती काढून टाकली. रुद्राक्षाची माळ तर या आधीच काढली होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यापुढे कोणाचंही भविष्य पाहणार नाही असं ठरवून टाकलं आणि पुढची अनेक वर्षं माझ्यासकट कोणाचंही भविष्य पाहिलं नाही. आता केवळ उपासना करायची असं ठरवून टाकलं कारण मला माझ्यावर होणारे ग्रहांचे परिणाम थांबवायचे होते. मग उगीचच बाकी गोष्टीत कशाला पडा हा माझा मुख्य विचार होता.
आध्यात्मिक गुरु अनेकदा त्या त्या शिष्याकरिता योग्य काय हे त्याला त्याला सांगत असतात त्यामुळे ते Universal नियम असतातच असं नाही, पण काही वेळा असं दिसतं की शिष्य मात्र त्याच चष्म्याने इतरांकडे पाहतात आणि आपली जगाबद्दलची मतं तयार करतात आणि त्यामुळे त्यांचं जग संकुचित होत जाऊ शकतं. याचा दुसरा परिणाम म्हणजे आपण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणं किंवा आहे ते लपवण्याचा प्रयत्न करणं.
स्वामींनी सांगितलेला सगळा विचार ध्यान करणाऱ्यांकरिता आहे पण बाकी उपासनापद्धतींबद्दल काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये घोळत होता. त्याबद्दल पुढच्या भागात बोलूया.
क्रमशः
(c) Gaurish Borkar #daivianubhav #gaurishborkar
Comments
Post a Comment