आमचे स्वामी ५

अनुग्रहानंतरचं एक-दीड वर्ष सगळं छान सुरु होतं. सगळी ध्यानकेंद्रे अगदी office जवळच होती. आठवड्यातून २ वेळा तरी स्वामीजीबरोबर ध्यान व्हायचं. त्यावेळी ध्यान करताना माझी मान डोलायची. याबद्दल मी स्वामीजींना विचारल्यावर ते म्हणाले की योगाची background आहे, त्यामुळे असं होतं. हळूहळू कमी होईल. त्यानुसार हळू हळू कमी होऊन पुढे मान डोलणं पूर्ण बंद झालं.

ध्यानामध्ये वेगवेगळे रंग दिसणे, कानातून गार हवा येणे, ध्यानामध्ये बिन्दू दिसणे असे अनुभव मला येत होते. एकदा स्वामीजीनी warn केलं. अगदी सहज म्हणाले की डोळ्यावर कोणताही प्रकाश पडत असेल तर येणारे अनुभव प्रकाशामुळे असू शकतात, ते योगाचे असतातच असं नाही. मग मी एकदा काळोख करून घरी ध्यानाला बसलो आणि खात्री करुन घेतली.

खरं तर मला या अनुभवांमध्ये काहीच interest नव्हता. योगाच्या अनुभवांबद्दल मी बरंच ऐकलं होतं आणि आपल्याला याच्याशी काहीही देणं घेणं नाही हे माझ्या मनात पक्कं होतं.

सूर्योपासनेवर मात्र स्वामींजींचा भर असायचा. ते रोज सकाळी संध्या करायचे. अगदी परगावी सुद्धा ते संध्येसाठी स्वत:च पळी-भांडं घेऊन जायचे.

ध्यानासाठी कोणती योगासनं करायची असा प्रश्न एकदा स्वामींजींना विचारला असता ते म्हणाले की spine twist होईल अशी आसनं केली तर पुरेसं आहे.

नंतर स्वामीजीनी एकदा सांगितलं की काही ठिकाणी ॐ अ-ऊ-म असा म्हणतात. पण आपण तसं म्हणायचं नाही. आपण आपलं ॐ म्हणायचं. शक्य तेवढा मकार लांबवायचा.

पुढे एक दिवस ध्यानकेंद्रात मला ॐ स्फुरला. पण या ॐ चा rhythm आणि आपण म्हणतो तो ॐ यात फरक होता. त्यामुळे हा खरा की आपण म्हणतो तो खरा असा प्रश्न माझ्या मनामध्ये सतत घुटमळू लागला.

एक दिवस आम्ही दोघेच असताना मी हा विषय छेडला. स्वामींजींना मी म्हटलं की "आपण म्हणतो तो ॐ आणि स्फूरतो तो ॐ किती वेगळा असतो ना?" माझी अपेक्षा होती की स्वामीजी मला यातला फरक सांगतील किंवा कोणता खरा ते सांगतील. पण यातलं काहीच घडलं नाही. त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि ते फक्त 'हू' एवढंच म्हणाले. त्यानंतर त्यांनी डोळे बंद करून घेतले. दोन मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले आणि तेवढ्यात कोणीतरी आलं. स्वामीजी मला म्हणाले “तू ये आता”. मला वाटलं शेवटी माझा प्रश्न अनुत्तारितच राहिला. पण पुढच्याच ध्यानात कोणताच योगिक अनुभव आला नाही. हळूहळू माझ्या लक्षात आलं की आपले अनुभव कायमचे बंद झाले आहेत. माझा प्रश्नच समूळ नष्ट करण्यात आला असावा अशी शंका मला आली.

मला येणारे अनुभव खरे होते का? ते असे एका क्षणात बंद करणं शक्य असतं का? स्वामीजींना एवढी Power आहे की हा योगायोग होता? हे आणि असे अनेक प्रश्न माझ्या मनात घर करुन राहिले. कालांतराने यातील काही प्रश्नांची उत्तरं मला मिळाली.

आज मी ज्यावेळी यावर विचार करतो त्यावेळी मला वाटतं की योगाच्या अशा अनुभवांचे २ issues आहेत. पहिला म्हणजे कशातच काही नसताना आपल्याला एकदम 'बन चुके' असं वाटायला लागतं. थोडा विचार करता असं लक्षात येतं की कोणताही अनुभव वृत्ती निर्माण करतो. जर पुन्हा अनुभव आला नाही तर कसा आला नाही, आणि आला तर त्याचं निरीक्षण किंवा विश्लेषण, त्याबद्दलचचे विचार आणि येऊन गेला तर, का गेला याबद्दलच्या वृत्ती. शेवटी जाणिवेच्या ऐवजी अनुभवाचच ध्यान होतं. जेव्हा ध्यानाचा सुरवातीचा उद्देशच वृत्ती कमी करणं किंवा थांबावणं असा आहे तेव्हा वृत्तीना चालना देणारे अनुभव ध्यानाला कसे काय उपयोगी पडतील?

स्वामीजी एकदा म्हणाले होते की देवाने आपल्याला जर काही ऐहिक दिलं तर ती त्याची दया आहे असं म्हणता येईल आणि जर का ध्यानाला सहाय्यक परिस्थिती निर्माण झाली तर ती त्याची कृपा आहे. योगाचे अनुभव थांबले ही स्वामीजींनी केलेली मोठी कृपाच होती असं मी मानतो.

चैतन्यः शाश्वतः शान्तो व्योमातीतो निरञ्जनः।

बिन्दूनाद कलातीत: तस्मै श्रीगुरवे नमः ।।


-गौरीश बोरकर

ऑगस्ट १६ २०२६ 

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

मराठी ग्रंथ: वैदिक नक्षत्र ज्योतिष