आमचे स्वामी ४

 एका रविवारी सकाळी सकाळीच एक Phone आला. आई म्हणाली की phone वर कोणीतरी गौरीश आहे का असं विचारतंय . त्यावेळी मला सहसा कोणाचे Phone येत नसत त्यामुळे आईला आणि मला दोघांनाही आश्चर्य वाटलं. आश्चर्याच्या भरातच मी phone घेतला. पलीकडून एक ताई बोलत होत्या. त्या म्हणाल्या तुला आज वेळ आहे का असं स्वामीजींनी विचारायला सांगितलंय. मी म्हटलं कशासाठी वेळ आहे का असं विचारताय? त्या म्हणाल्या आम्ही सगळे देहूला चाललोय, संध्याकाळी परत येऊ. रविवार होता, तसंही फार काही करण्यासारखं नव्हतं, मी म्हटलं हो, चालेल, मी येईन. कुठे यायचंय? त्या म्हणाल्या आम्ही तुमच्या २ गल्ल्या पलीकडेच राहतो. Sharp १० वाजता तू तिथे ये. आपण इकडूनच जाऊ.

मी त्यांना बरं म्हटलं खरं पण माझ्या डोक्यात विचार सुरू झाले. या आहेत कोण? हे सगळे देहूला कशाला जात असावेत? आपल्याला कशाला बोलावलं असेल? आपण जाणार कसे आहोत? असं बरंच काही. मी अगदी वेळेत त्यांच्याकडे पोचलो. तसा थोडा awkward च होतो. कोणाशी ओळख वगैरे करून घ्यायची मला अजिबातच सवय नव्हती. Mostly त्यांचे पती एक मोठे सनदी अधिकारी होते आणि त्यांच्या Jeep मधून आम्ही जाणार होतो. (हो त्यावेळी महिंद्राची Jeep असंच म्हणायचे आता SUV वगैरे म्हणतात.) जीप मध्ये बसल्यावर मी त्यांना दबक्या आवाजात विचारलं की आपण देहुला कशाला चाललोय? त्या म्हणाल्या स्वामीजींच्या पुस्तकाचं देहूला प्रकाशन होणार आहे त्या कार्यक्रमाच्या planning साठी चाललोय. आता तर मला फारच आश्चर्य वाटलं. मी त्यांना लगेच म्हटलं की मग मला कशाला बोलवलंय? त्या थोड्याशा आश्चर्य आणि कौतुकाच्या स्वरात म्हणाल्या की स्वामीजींनी सांगितलंय की “तुला त्यांच्या सहवासाची आवश्यकता आहे.”

हे ऐकून मी एकदम गप्पच झालो. खरं तर मला हे सगळं झेपत नव्हतं. ज्या व्यक्तीशी आपण अगदी कधीतरी जुजबी बोलतो. ज्यांना आपण आपल्या आयुष्याबद्दल कधीही काहीही सांगितलेलं नाही. त्यांनी माझा पत्ता शोधून (अनुग्रहच्या वेळी त्यांनी घेतला होता), आमच्या अगदी जवळ राहणार्‍या Volunteer ला आमचा Phone देऊन त्यांच्या बरोबर मला घेऊन यायला सांगितलं. ही गोष्ट मा‍झ्या कल्पनेच्या अगदीच पलीकडची होती.

सगळे जण वेगवेगळ्या वाहनांतून देहूला पोहोचले. मला तसंही काही माहिती नव्हतं आणि त्या सगळ्यांची कार्यक्रमाबद्दल चर्चा सुरू होती, त्यामुळे मी इकडे तिकडे घुटमळत होतो. मग दुपारी आम्ही कोणाकडे तरी थांबून जेवण केलं आणि Mostly तिथे एक Meeting झाली. त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. या सगळ्यात ना मी स्वामीजींशी काही बोललो ना ते माझ्याशी काही बोलले.

त्या सगळ्यात मला एवढंच कळलं की तिथे आलेली सगळी मंडळी त्यांच्या क्षेत्रात मोठी असावी आणि

विभूषणं मौनम् अपंडितानाम् |

या उक्तिनुसार गप्प बसण्यात आपलं शहाणपण आहे. त्यामुळे ना मी कोणाशी ओळख करून घेतली ना कोणाशी फार संवाद साधला.

तुकाराम महाराजांच्या जीवनावर आणि अभंगांवर स्वामीजींनी लिहिलेल्या ‘दिव्यात्वाचा संस्पर्श’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या Planning ची ती Trip होती. ‘ध्यानयोग - अष्टांग विवरण’ हा स्वामीजींचा ग्रंथ या आधी प्रकाशित झाला होता. त्यामुळे हा Mostly त्यांचा दुसरा ग्रंथ होता. प्रकाशन सोहळ्याला मात्र काही कारणाने मला देहूला जाता आलं नाही.

घरी आल्यावर आईने विचारलं की आज काय झालं? मी तिला इतिवृत्तांत सांगितला. पुढे तिने विचारलं की तिथे तुझं काय काम होतं? मी म्हटलं काहीच नाही. तिला वाटलं असेल हा उगीचच फिरून आला. पण तरीही एक गोष्ट मात्र मा‍झ्या लक्षात आली की ना आपण स्वामीजींच्या गाडीत होतो, ना आपण त्यांच्याशी बोललो, ना ते आपल्याशी बोलले पण नुसतं स्वामीजींच्या आजूबाजूला राहणं आल्हाददायक होतं, खूपच relaxing होतं.

त्याबरोबरच मला काही प्रश्नही पडले. मला स्वामीजींच्या सहवासाची गरज आहे याचा अर्थ काय आहे? आपली State of Mind यांना कळत असावी का? आपण गेली ५-७ वर्षं जी challenges face करतोय याचा स्वामीजींना अंदाज आला असावा का? वगैरे वगैरे अर्थातच याची उत्तरं मला पुढे मिळाली.

माझ्यासारख्या अनेक युवकांना स्वामीजींनी आपलंसं केलं. त्यांना उभारी दिली, सावरायला मदत केली. तसा स्वामीजींना खूप वेळ नसायचा पण ते वेळ शोधायचे. कधी ते कोणाला घरी बोलावत आणि त्यांना बरोबर घेऊन युवा केंद्रात येत. कधी कधी ते परगावच्या प्रवासात कोणाला बरोबर नेत. कधी कोणाला ते दिवसभर घरी बोलवत. कधी कोणाला मदतीला घेत. कधी कोणाला काही काम संगत, पण अनुभव एकच होता. सगळ्यांनाच शांत वाटायचं, बरं वाटायचं, stress निघून जायचा, emotional healing व्हायचं. आपण काही बोलल्याशिवाय स्वामीजी सहसा त्या विषयावर बोलायचे नाहीत, त्यावर चर्चा करायचे नाहीत, उगीच सल्ला द्यायचे नाहीत. पण या सगळ्यात तो विषय मात्र नक्की पुढे जायचा.

आई-बाबा होऊन त्यांनी आणि आशाताईंनी कोणाचं कन्यादान केलं तर कोणाच्या लग्नात ते दोघे वराचे आई-बाबा झाले, कोणाला पुन्हा संसार थाटायला उभारी दिली, कोणाचे संसार तुटण्यापासून थांबवले. त्यांनी कोणा कोणाला कीती आणि कशाप्रकारे support केला हे स्वामीजी आणि त्या व्यक्ति सोडून इतरांना माहीत असणं निव्वळ अशक्य वाटतं.

हे सगळं सुरू असताना एक गोष्ट मात्र स्वामीजी नेहमी सांगायचे की ईश्वरप्राप्ती हेच आपल्या आयुष्याचं सर्वोच्च ध्येय आहे आणि आपण ते शक्य तेवढं लवकर प्राप्त करुन घेतलं पाहिजे.

आपली माता आणी पिता| तेहि गुरुचि तत्वतां |

परी पैलापार पावविता| तो सद्गुरु वेगळा ||७||

                                                   - दासबोध ५-२

-गौरीश बोरकर

ऑगस्ट १०, २०२६

#aamacheswami

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

मराठी ग्रंथ: वैदिक नक्षत्र ज्योतिष