आमचे स्वामी २

आमचे स्वामी २

त्या दिवशी त्या आजोबांनी मला आणखी एक मुद्दा सांगितला. ते म्हणाले की माधवनाथ स्वामी शुद्ध परमार्थ सांगायचे. मी त्यांना विचारलं की शुद्ध परमार्थ म्हणजे काय? तेव्हा ते म्हणाले की म्हणजे उपास तापास वगैरे असलं काही करायचं नाही. थोडक्यात कोणत्याही सकाम उपासना करायच्या नाहीत. फक्त ध्यान करायचं!

मी म्हटलं ठीक आहे. काही हरकत नाही. मी घरी गेलो आणि रुद्राक्षाची माळ काढून टाकली. आईला सांगितलं की आतापासून मी उपास बंद करतोय. आईला बरं वाटलं कारण तेवढंच तिचं काम सोपं झालं. पण माझ्या पुढच्या वाक्याने मात्र ती भडकली. मी तिला म्हटलं की मी आजपासून ज्योतिष पण बंद करतोय अगदी घरच्यांचं सुद्धा पाहणार नाही. तिला वाटत असावं की याला चार पैसे कमवायचा तेवढा एकच मार्ग होता तो सुद्धा बंद केला तर हा खाणार काय? ती म्हणाली तू रोज काहीतरी नवीन शोधून काढतोस. काहीतरी एक नीट धर. आणि बरंच काय काय बोलली. मुलांच्या चरितार्थाची जेवढी काळजी आईला असते, तेवढी मला वाटतं त्यांना स्वतःला सुद्धा नसते. तरीही मी स्वत:च ठरवून टाकलं की यापुढे ज्योतिष बंद म्हणजे बंद. खरं तर वयाच्या १४ व्या वर्षापासून सुरू असलेला आणि माझा अत्यंत प्रिय विषय मी आज जवळ जवळ ६ वर्षानी कायमचा बंद करून टाकणार होतो. पण जमिनीवर झोपणं, गार पाण्याने आंघोळ आणि कांदा लसूण न खाणं या गोष्टी मात्र पुढे सुरूच ठेवल्या.

अगदी हल्ली हल्ली पर्यंत म्हणजे २०१५ पर्यंत मी ज्योतिषापासून एवढा दूर होतो की आमचं लग्न झालं तेव्हा कल्याणीलासुद्धा याबद्दल काहीच माहिती नव्हतं. स्वरूपयोगमध्येसुद्धा माझ्या ज्योतिषाच्या अभ्यासाबद्दल काहीच माहीत नसण्याचं हेच कारण होतं. मी जवळ जवळ १७-१८ वर्षं ना कोणाची पत्रिका पहिली की कोणाला भविष्य सांगितलं. ज्योतिष हा विषय पुन्हा सुरू होण्याचं कारण म्हणजे मला ज्योतिषाचा संबंध embryology आणि modern psychology शी कसा लागतो ते एकदा सहज सुचलं आणि हे document करणं आवश्यक आहे असं वाटल्याने अनेक कुंडल्यांवर ते apply करुन मग मी Untold Vedic Astrology हे पुस्तक लिहिलं.

अनुग्रहाच्या आधी एक दोन दिवस मी त्या आजोबांना विचारलं की अनुग्रहाला काय काय न्यायचं असतं? तर ते म्हणाले असं काहीच नाही आपल्याला जमेल आणि वाटेल तेवढं नेलं तर पुरेसं आहे.

अनुग्रहाच्या दिवशी मी काही फुलं आणि नारळ घेऊन जायचं ठरवलं. त्यावेळी स्वामीजी भांडारकर रोड वरच्या त्यांच्या घरात रहात होते. नेहमीप्रमाणे थोडा उशीराच पोहोचलो. आधीच काहीजण येऊन Living Room मध्ये जमिनीवर बसलेले होते. पुढे एक सोफा आणि बाजूला एक टेबल असावं बहुधा. सगळी कडे शांतता होती. सगळं बोलणं अतिशय हळू आवाजात चाललं होतं. तिथे काही volunteers होते त्यांनी माझ्या हातात एक ताट दिलं आणि मी आणलेल्या वस्तु त्यात ठेवायला सांगितल्या. मला वाटतं की कोणी जर काहीच न घेता आले तर त्यांच्यासाठी सुद्धा थोड्या फुलांची व्यवस्था तिथे केलेली होती. एक एक जण आतल्या खोलीत जात होता आणि बाहेर येत होता. आत काय सुरू आहे याची मलाही उत्सुकता होती.

शेवटी माझी वेळ आली आणि मला आत जायला सांगण्यात आलं आत सतरंजीवर काही जण डोळे मिटून बसले होते स्वामीजी त्यांच्या आसनावर बसले होते आणि मला वाटतं बाजूला एक रिकामी single bed होती. पण नक्की आठवत नाही. पण अगदी साधी खोली होती. स्वामीजी mostly जांभळ्या रंगाचं सोंवळं नेसून बसले होते. मी त्यांच्या हातात नारळ दिला. त्यांना आणलेली फुलं वाहणार होतो पण Mostly त्यांनी ती हातातच घेतली. पुढे परंपरेचा श्लोक आणि संप्रदायाचा मंत्र सांगितला आणि म्हणायला लावला. एक बोट कपाळाला लावलं आणि एक बोट डोक्यावर म्हणजे टाळूला लावलं. टाळूला थोडंसं गरम वाटलं. बाकी तसं फारसं काहीच नाही. स्वामींनी मला तिथेच थोडा वेळ बाजूला डोळे मिटून बसायला सांगितलं आणि मग थोड्या वेळाने मी उठून घरी गेलो. जायच्या आधी स्वामीजींनी सांगितलं की contact मध्ये रहा आणि ध्यानाला येत जा. नाव, पत्ता आणि phone number आम्ही सगळ्यांनी दिलाय ना याची खात्री त्यांनी करुन घेतली.

स्वामीजींच घर अगदी साधं होतं त्यांच्या Hall मध्ये आम्ही बसलो होतो त्याच्या बाजूलाच kitchen होतं. आम्हाला अनुग्रह दिला ती एक खोली होती आणि kitchen च्या पलीकडे आत एक खोली असावी असा माझा अंदाज होता.

घरी गेल्यावर आईने काय काय झालं? असं विचारलं आणि मी तिला इतिवृतान्त सांगितला. Mostly काहीतरी भारी अनुभव असेल अशी तिची अपेक्षा असावी त्यामुळे ती यावर फार काही बोलली नाही.

खरं तर ज्यांना मी आयुष्यात कधीही भेटलो नव्हतो ज्यांच्याशी कधीही बोललो नव्हतो त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती अशा एका व्यक्तिकडून म्हणजे स्वामींकडून आज मी अनुग्रह घेतला होता आणि याबद्दल माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. संध्याकाळी त्या आजोबांना सगळा वृतान्त सांगितला. माझ्यापेक्षा तेच जास्त आनंदात होते.

आज ज्यावेळी याबद्दल मी विचार करतो त्यावेळी मला वाटतं की अनुग्रहापूर्वी २ गोष्टी तरी पाहायला पाहिजेत. पहिली म्हणजे आपल्या Goal पर्यंत आपण पोहोचू याची खात्री करुन घेणं आवश्यक आहे आणि दुसरी म्हणजे आपल्या आणि आपल्या सद्गुरूंच्या प्रकृतीमध्ये थोडं तरी साम्य आहे ना, हे पहिलं पाहिजे. तसं जर नसेल तर Learning curve खूपच steep असतो. अर्थातच शिकायला खूप जास्त मिळतं. दुसरी गोष्ट mandatory नाही आणि जर choice असेल तरच हा प्रश्न येतो.

समर्थांनी दासबोधमध्ये गुरुलक्षण असा एक संपूर्ण समास लिहिला आहे. खाली दिलेली ओवी त्याच समासातील आहे.


मुख्य सद्गुरूचें लक्षण । आधीं पाहिजे विमळ ज्ञान ।

निश्चयाचें समाधान । स्वरूपस्थिती ॥ ५-२-४५॥

 

-गौरीश बोरकर

जुलै २८ २०२६


#aamacheswami

https://granthrajdasbodh.blogspot.com/2011/05/blog-post.html


Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

मराठी ग्रंथ: वैदिक नक्षत्र ज्योतिष