आमचे स्वामी १
साधारण सहावीत किंवा सातवीत असताना माझ्या जीवनात अशा काही गोष्टी झाल्या की त्या घटनांनी मला विचार करायला भाग पाडलं. याचे 2 भाग होते. पहिला भाग म्हणजे एखाद्या व्यक्तीची काहीच चूक नसताना त्याला अशा काही गोष्टी का face कराव्या लागतात आणि काय केल्याने असं होणार नाही.
तशी या प्रश्नांची उत्तरं सोपी नव्हती त्यामुळे हे प्रश्न पुढे बरीच वर्ष तसेच राहिले. पण आठवीत असताना news paper मध्ये एका ज्योतिष विद्यालयाची जाहिरात वाचली. त्यांच्या office मधे जाऊन त्यांना भेटून आलो आणि घरी येऊन सगळी माहिती सांगितली. माझे आजोबाच ज्योतिषी असल्याने ज्योतिष शिकायला कोणाचाच विरोध झाला नाही. ज्योतिष शिकल्याने आपल्याला भविष्य कळेल आणि आणि अशा गोष्टी आपल्या आयुष्यात पुन्हा घडणार नाहीत ही या मागची idea होती.
एक वर्षाचा course पूर्ण झाल्यावर आजोबांच्या मदतीने मी भविष्य तर सांगू लागलो पण माझा मोर्चा उपायांकडे वळला. काय उपाय केल्याने काय होतं यामध्ये मला interest होता. त्यानुसार मी गळ्यात 54 रुद्राक्षांची माळ घातली त्यात 3 चतुर्मुखी रुद्राक्ष होते. त्यानंतर गुरुवार, शनिवार आणि संकष्टी हे 3 उपास सुरु केले. कांदा लसूण खाणं सोडलं. सतरंजीवर झोपायला सुरवात केली आणि गार पाण्याने अंघोळ करू लागलो. शेवटी सच्चिदानंद या मंत्राचा जप येता जाता मोठ्या आवाजात सुरु केला.
हे सगळं एक एक करून केलं. साधारण कधी काय केलं ते आता आठवत नाही पण 12 वी पर्यंत यातलं बरचसं करत होतो असं वाटतंय.
11 वी आणि 12 वीची वर्ष तर फारच difficult गेली. पुढे 12वीत engineering ला admission साठी आवश्यक तेवढे marks मिळाले नाहीत. Donation देऊन admission घ्यायची नाही असं ठरवलं होतं त्याप्रमाणे BSc ला admission घेतली. त्या बरोबर NIIT मधे computer चा course आई म्हणते म्हणून लावला. त्यांची test crack केल्यामुळे त्या course ला 75% scholarship मिळाली त्यामुळे फार खर्च झाला नाही.
या सगळ्यामुळे असल्या उपयांचा फार उपयोग होत नाही या conclusion ला मी आलो आणि आणखी शोधाशोध सुरु केली. त्यात गुरुचरित्र आणि नवनाथ भक्तीसार एकदा वाचलं. भाऊ म्हणजे माझे बाबा रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांचं साहित्य वाचायचे आणि ते ग्रंथ आमच्याकडे होते. ते वाचायला लागलो. त्यातून लक्षात आलं की या सगळ्यातून सुटण्याचा एक मार्ग म्हणजे आपण भवाच्या पलीकडे गेलं पाहिजे! (पण भव म्हणजे काय हे मात्र कळत नव्हतं) आणि यासाठी गुरूंची आवश्यकता आहे. पण आता गुरु शोधायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला. आमच्या आजूबाजूला काही व्यक्ती होत्या त्यांना intuition वगैरे होतं पण त्या आपल्याला या बाबतीत उपयोगी पडतील असं मला अजिबात वाटलं नाही.
हे सगळं समजेपर्यंत graduation पूर्ण झालं. पण NIIT चा course पूर्ण व्हायचा होता. नोकरीचा काही पत्ताच नव्हता. भविष्य सांगून काही कमाई करावी अशी आईची इच्छा होती पण ज्योतिष्यावर आपला चरितार्थ चालवायचा नाही हे मी पक्कं ठरवलं होतं.
तैसा संसार दुःखे दुःखवला।
त्रिविधतापे पोळला।
तोचि अधिकारी झाला।
परमार्थासी।। दासबोध ३-६-७
असं समर्थांनी म्हटलंय पण स्वामीजी म्हणत की ध्यान करायला असं काही होणं आवश्यक नाही. स्वरूपयोगमधे असे अनेक युवक आहेत जे असं काहीही नसताना यायला लागले आणि उत्तम ध्यान करतात. पण माझं मात्र तसं नव्हतं.
माझ्या आईच्या ओळखीचे अनेक जण आमच्याकडे येत आणि आलेल्या जवळ जवळ प्रत्येकाशी आई माझी ओळख करून द्यायची.
एक दिवस असेच एक आजोबा आले होते. आईने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ते गेल्यावर मला वाटलं की हे कोणत्यातरी संप्रदायाशी संबंधित असले पाहिजेत. मी आईला तसं विचारलं. आई म्हणाली तू त्यांनाच विचार. मी केवळ हा प्रश्न विचारायला त्यांच्या घरी गेलो. ते म्हणाले हो मी माधवनाथ स्वामींचा अनुग्रह घेतला आहे.
त्यावेळी माधवनाथ स्वामींबद्दल मला एकच गोष्ट माहिती होती. असं ऐकलं होतं की पुण्यातले अनेक Doctors त्यांचं प्रवचन ऐकायला जातात.
या आजोबांची तब्येत त्यावेळी तशी चांगली नव्हती. ते म्हणाले की अधून मधून येत जा. मला तसंही काही काम नव्हतं त्यामुळे मी कधी कधी त्यांना भेटायला जात असे. कधी कधी स्वामीजी त्यांची विचारपूस करायला कोणाला तरी धाडत असत. त्यावेळी आमच्या काही गप्पा होत असत. मी त्यांना अनेक प्रश्न विचारत असे. शेवटी तुझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत असं त्यांनी एकदा सांगून टाकलं.
गप्पा गप्पांमध्ये एक दिवस ते म्हणाले की तू अनुग्रह का घेत नाही? मी त्यांना म्हटलं की शक्तिपात दिक्षा वगैरे मी घेणार नाही. कारण त्या आधी आमचे काही शक्तिपात दिक्षा घेतलेले नातेवाईक विविध क्रिया करताना मी पहिले होते आणि मला त्याची भीती वाटली होती. त्यावर त्यांनी सांगितलं की अरे ही शक्तिपात दिक्षा नाही. नाथ संप्रदायाची दिक्षा आहे अशा क्रिया बगैरे काहीही होत नाही.
मी म्हटलं बरं, मग काही हरकत नाही. ते कोणत्या तरी एका संप्रदायाचे आहेत असं मी आधीच ओळखलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या संप्रदायातील गुरूंकडून अनुग्रह घ्यायला माझ्यात फार resistance नव्हता. परिस्थिती सुद्धा अशी होती की मला माझ्या प्रश्नांचं चक्रव्युह आता काही करून तोडायचंच होतं.
ते म्हणाले तू डॉक्टर नगरकरांचा अनुग्रह घे. ते तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील. मी म्हटलं ok म्हणजे हे पण डॉक्टर आहेत. तर ते म्हणाले नाही. यांना अमेरिकेतल्या एका university ची post doctoral fellowship मिळाली आहे. मग मग मी म्हटलं म्हणजे PHD आहेत का? तर ते म्हणाले नाही हा PHD नंतरचा research असतो. त्यावेळी मला हे सगळं नवीनच होतं. दहावीनंतर शिक्षण सोडलं तर चालेल का असं वडिलांना विचारणाऱ्या आणि वडील म्हणाले म्हणून graduation करणाऱ्या मला PHD नंतरही काही पुढे काही असतं हे माहीत असणं कसं शक्य होतं? मला त्यातून फक्त एवढंच कळलं की हे कोणी तरी भारी असावेत. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, चालेल मी त्यांचा अनुग्रह घेईन.
तसं तर स्वामी माधवनाथांचे 2 उत्तराधिकारी आहेत. त्यातले आमचे स्वामी एक होते. स्वामींनी आता देह ठेवला असला तरी त्यांचेही 5 उत्तराधिकारी आहेत. त्यात सुद्धा 2 doctors (medical practitioners) आणि एक PHD आहे. हे पाचही अगदी young आहेत.
पुढे ते आजोबा मला म्हणाले, मी तारीख विचारून घेतो आणि तुझं नाव देतो. मी म्हटलं चालेल काही हरकत नाही.
मी घरी येऊन सगळं सांगितलं. आईच तसं for किंवा against असं काहीच मत नव्हतं. भाऊ तर आम्हाला नेहमीच freedom द्यायचे त्यामुळे त्यांना काहीच हरकत नव्हती.
पुढे एक दोन दिवसात मला तारीख कळली ती तारीख होती 30 डिसेंबर 1998.
-गौरीश बोरकर
जुलै २० २०२६
#aamacheswami
Comments
Post a Comment