दैवम् चैवात्र पंचमं?



ज्योतिषाच्या बाबतीत दैवम चैवात्र पंचमम् म्हणजे दैव हे भगवंतांनी शेवटचं सांगितलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी या कर्मावर अवलंबून असून दैवाला अतिशय नगण्य महत्त्व आहे हे सांगण्याकरता भगवद्गीतेचा अभ्यास करणाऱ्या काही अध्यात्मिक व्यक्ती ही ओळ वापरतात.

केवळ दैवावर अवलंबून राहून स्वतःचे नुकसान करून घेणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण त्याचबरोबर प्रामाणिक प्रयत्न करून अपयश आल्याने दैव समजून घेण्याचा  प्रयत्न करणारे सुद्धा बरेच आहेत. या सगळ्या विषयावर आपण चर्चा करण्याऐवजी गीता या विषयावर खरंच हे लोक म्हणतात तसं म्हणजे दैव पाचवं  आहे असं म्हणते का हे पाहूया.


अगदी दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की

नत्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनािधपाः। 

न चैव न भविष्यामः सव वयमतः परम् ॥१२॥

  • भगवद्गीता अध्याय २

अर्थ: मी कोणत्याही काळे नव्हतो,  तू नव्हतास,  किंवा हे राजे लोक नव्हते असे नाही. आणि यापुढेही आपण सर्वजण असणार नाही असेही नाही.


याचा अर्थ असा होतो की भगवद्गीतेला पुनर्जन्माची कल्पना मान्य असावी.  पुढे दुसऱ्याच अध्यायात  भगवान म्हणतात की


हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।

  • भगवद्गीता अध्याय २. ३७  

म्हणजे ( या युद्धामध्ये)  मारला गेलास  तर तुला स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकलास तर हे राज्य उपभोगशील.


याचा अर्थ असा होतो की नरकाबद्दल जरी भगवंत silent  असले तरी स्वर्गाची कल्पना  भगवद्गीतेला मान्य असावी.


पुढे आठव्या अध्यायात भगवंत म्हणतात


यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्‌ । 

तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ ६ ॥

  • भगवद्गीता अध्याय आठ

अर्थ - हे कुंतीपुत्र अर्जुना, देह ठेवताना (केवळ माझेच नव्हे तर) ज्या ज्या भावाचे स्मरण ती व्यक्ती करते, त्या त्या भावाला ती जाऊन मिळते. कारण ती नेहमी त्याच भावात असते.

याचा अर्थ असा होतो की पुढच्या जन्माच्या भावावर  पूर्वीच्या जन्माचा किंवा अंतकाळाचा परिणाम असतो  हे भगवद्गीतेला मान्य असावे.

त्यामुळे पुनर्जन्म, पूर्व जन्मातील कर्माचा  पुढील जन्मावर होणारा परिणाम आणि स्वर्गप्राप्ती या तीनही कल्पना भगवद्गीतेला मान्य  असाव्या असे दिसते.

 आता आपण आजचा मुख्य विषय म्हणजे पाचवे दैव याकडे येऊया. हा श्लोक गीतेच्या १८ व्या म्हणजे शेवटच्या अध्यायात आला आहे. तो पूर्ण श्लोक असा आहे. 


अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्।

विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।। १८.१४ ।।

अर्थ - अधिष्ठान (शरीर), कर्ता (भोक्ता), वेगवेगळे करण (१२ इंद्रिये), विविध चेष्टा (शरीरात होणाऱ्या क्रिया किंवा involuntary actions) आणि पाचवे दैव सुद्धा आहे.

इथे कंसातील शब्द श्री आद्य शंकराचार्यांच्या गीतेवारील टीकेतून घेतलेले आहेत. पण मुख्य म्हणजे इथे केवळ ५ गोष्टी दिलेल्या आहेत. या श्लोकात बाकी काहीही नाही. बऱ्याचदा हा श्लोक जो तो आपल्याला हवा त्या संदर्भात वापरतो. पण मग याचा खरा संदर्भ काय? असा प्रश्न निर्माण होतो आणि याचे उत्तर भगवंतांनी पुढच्या श्लोकात दिले आहे. तो पुढचा श्लोक खालीलप्रमाणे आहे.

शरीरवाङ्मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः।

न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः।।१८.१५।।

अर्थ - मनुष्य शरीर, वाचा आणि मनाने ज्या ज्या कर्मांची सुरवात करतो, ती कर्मे जरी न्याय्य अथवा त्या विरुद्ध असली तरी त्याची ही पाच कारणे आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे इथे कुठेही दैव शेवटचं आहे असं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे माणूस जी कर्मे करतो त्या कर्मांचे दैव हे एक कारण आहे असं इथे म्हटलेलं आहे. बाकी कारणे सुद्धा त्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आहेत. त्यातील दुसरं एक कारण (चेष्टा) तर शारीरिक क्रियांशी म्हणजे involuntary actions शी संबंधित आहे. तिसरे कारण शारीरिक क्षमतांशी (अधिष्ठान) संबंधित आहे, पुढचं कारण जीवाशी संबंधित आहे आणखी एक कारण इंद्रियांशी संबंधित आहे. या पाचही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढणं अतिशय अवघड आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. 

त्यामुळे या सगळ्यावर पूर्वकर्माचा परिणाम आहे. जन्मकाळची ग्रह स्थिति म्हणजे तुमची पत्रिका पूर्वकर्मचा या जन्मावरील परिणाम दाखवते आणि या जन्मामध्ये योग्य निर्णय घ्यायला सहाय्य करते बस एवढंच.

तेव्हा दैवम चैवात्र पंचमम् म्हणजे गीतेने दैवाला पाचवं स्थान दिलं आहे असं इथे कुठेही दिसत नाही. याउलट गीता सांगते की कर्माच्या प्रवृत्तीचं दैव हे सुद्धा एक कारण आहे.

यापुढे जर कोणी दैवं चैवात्र पंचमम् असं म्हटलं तर त्यांना एवढंच विचारा की त्याच्या पुढचा श्लोक तुम्ही वाचला आहे का? नसेल तर नक्की वाचा.


(c) गौरीश बोरकर 


#gaurishborkar

#thinkingaloud


Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा